Ad will apear here
Next
सोनाली कुलकर्णी, कमलाबाई कामत-गोखले, विमल जोशी


प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा १८ मे हा जन्मदिन. तसेच, स्त्री भूमिका पुरुषांनीच करण्याच्या काळात अशा भूमिका करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री कमलाबाई कामत-गोखले आणि जुन्या काळातील रंगकर्मी विमल जोशी यांचा १८ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........
सोनाली कुलकर्णी
१८ मे १९८८ पुण्यात खडकी येथे सोनाली कुलकर्णीचा जन्म झाला. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून, त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे. तिच्या आई, सविंदर पंजाबी असून, त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून, माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

सोनाली कुलकर्णीने कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरवचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. सोनाली प्रामुख्याने तिच्या ‘नटरंग’ ह्या चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीवरील नृत्यासाठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. त्यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा, आणि झपाटलेला दोन अशा चित्रपटांमध्ये काम केले. 

२०१४मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता. स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतून हिंदी चित्रपटांकडे गेलेल्या काही मोजक्याच अभिनेत्रींना यश मिळाले आहे. यात सोनाली कुलकर्णीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. सोनाली कुलकर्णीने ‘ग्रँड मस्ती’ ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यात तिने रितेश देशमुखच्या पत्नी, ममता हिची भूमिका केली होती. तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटातदेखील सोनाली सोनाली कुलकर्णीने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. 

अलीकडेच सोनालीचे धुरळा, हिरकणी, विकी वेलिंगकर हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. लवकरच सोनालीचा झिम्मा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी अशा विविध भाषांतील सुमारे ८० चित्रपटांत सोनाली कुलकर्णीने अभिनय केला आहे. सोनाली कुलकर्णीने यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाला मदत करून आजचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीतील ‘यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल’ला मदत दिली जाणार आहे. 
..........
कमलाबाई कामत-गोखले
सहा सप्टेंबर १९०१ रोजी कमलाबाई कामत यांचा जन्म झाला. कमलाबाई यांचे वडील उत्तम कीर्तनकार होते, तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवत. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या; पण घरची स्थिती हलाखीची असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा, तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. याच मेळ्याच्या माध्यमातून संवाद, संगीत आणि अभिनयाचे धडे त्यांनी गिरवायला सुरुवात केली. याचा उपयोग कमलाबाईंना पुढे मूकपट, तसेच संगीत नाटकांसाठी झाला. 

भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली ती २०व्या शतकाच्या आरंभी. त्या काळी आपल्या समाजात प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्त्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणाऱ्या कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती; पण त्या काळी या नाटकांमध्ये स्त्री भूमिकाही पुरुष साकारत असत. याच काळात म्हणजे १९१३ साली चित्रपट युग सुरू झाले ते राजा हरिश्चंद्रपासून. 
त्या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मूकपटाचा प्रयोग सुरू झाला होता. आपल्या आगामी बोलपटांमध्ये स्त्री पात्रे ही स्त्री कलाकारांनी साकारावीत या मताचे दादासाहेब फाळके होते. त्याच वेळी कोणीतरी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं. फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मूकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड झाली आणि त्यांच्या रूपानं रूपेरी पडद्याला एक स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला. विशेष म्हणजे मोहिनी भस्मासुर या चित्रपटात कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांचीसुद्धा पार्वतीच्या छोट्या भूमिकेसाठी निवड झाली. सर्व स्तरातून या भूमिकेचं स्वागत झालं आणि पुढे कमलाबाईंच्या अभिनयाची कमान चढतीच राहिली. 

पुढे अनेक मूकपटांमधून परिपूर्ण भूमिका साकारून त्यांनी स्त्री कलाकारांना एकाअर्थी या क्षेत्रात येण्यासाठी हे उदाहरण आपल्या रूपानं ठेवलं असंही म्हणता येईल. चित्रपटांपेक्षाही तो काळ नाटकांचाच होता. पण अशा वेळी संगीत नाटकांतील महत्त्वपूर्ण अशी किर्लोस्कर कंपनी बंद पडल्यानं, रघुनाथराव गोखले यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीची स्थापना केली आणि गद्य नाटके रंगभूमीवर सादर होऊ लागली. या नाटकांमधून कमलाबाईंनी भूमिका साकारल्या; पण अशातच रघुनाथरावांचे निधन झाले आणि रामभाऊ गोखले यांच्याकडे ‘चित्ताकर्षक’ची सूत्रे आली. त्यांनी पुन्हा संगीत आणि पौराणिक नाटकांची निर्मिती सुरू केली. 

पुंडलिक, तसेच मृच्छकटिक ही नाटकं ‘चित्ताकर्षक’तर्फे सादर होऊ लागली होती. या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रमुख भूमिका केल्या. त्यामुळे नाट्यसंगीतालाही सुरेल बाज लाभला. ‘चित्ताकर्षक’चे मालक राजाभाऊ गोखले यांच्याबरोबर विवाहबद्ध होऊन त्या कमलाबाई गोखले झाल्या. पती-पत्नी दोघेही एकाच क्षेत्रातले असल्यानं त्यांचं बिऱ्हाडही सतत फिरत राहिलं. पण दुर्दैवाने चित्ताकर्षक मंडळी नुकसानीत आल्यानं कंपनीला टाळं लागलं. अनेक प्रश्न भेडसावत होते; पण कमलाबाईंनी हार मानली नाही. त्यांनी मनोहर स्त्री संगीत मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या काळात फक्त स्त्रियांची नाट्यकंपनी असणं हे कला आणि मनोरंजन सृष्टीसाठी सूचक असं पाऊल होतं आणि या नाट्यकंपनीचं वैशिष्ट्य हेच की स्त्री आणि पुरुषांची पात्रं स्त्रियाच सादर करत. 

या सुमारास नाट्यकलाप्रसाद या नाट्यकंपनीनं अस्पृश्यता निवारण हा सामाजिक प्रश्न रंगभूमीवर आणला, ज्या विषयाचा उच्चार करणंही धाडसाचं होतं, ते ‘उ:शाप’च्या माध्यमातून जनतेसमोर आले. कमलाबाईंनी काळाची गरज ओळखून या नाटकात समर्थपणे भुमिका साकारली. पेशव्यांचा पेशवा या ऐतिहासिक नाटकातली त्यांची आनंदीबाईची भूमिका, सौभद्रमधील सुभद्रा व अर्जुन, मानापमानमधील धैर्यधर (पुरुषपात्र) या व्यक्तिरेखा तर गाजल्याच; पण विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करून दिला. 

तब्बल २००हून अधिक नाटकं, मूकपट, त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका, तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई गोखले कायमच लक्षात राहतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आणि चाळीस वर्षं या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल, त्यांचा वयाच्या ७०व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या हस्ते सत्कार झाला. रीना मोहन या बंगाली दिग्दर्शिकेने हिंदीमध्ये त्यांच्यावर टेलिफिल्मही बनवली. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते. चंद्रकांत गोखले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कलेचा वारसा अभिनयातून आपल्यासमोर आणला आणि विक्रम गोखले यांच्या रूपात आज कमलाबाईंची तिसरी पिढी या क्षेत्रात समर्थपणे कारकीर्द घडवतेय. कमलाबाईंचे निधन १८ मे १९९७ रोजी झाले. (संदर्भ : सागर मालाडकर)
.......
विमल जोशी
१९३१ साली विमल जोशी यांचा जन्म झाला. आकाशवाणीवर ३५ वर्षे नोकरी करून, कामगार आणि स्त्रियांसाठीच्या कार्यक्रमांतून अनेक कलावंतांनाही रेडिओवर येण्याची संधी त्यांनी मिळवून दिली. विमल जोशी यांनी आकाशवाणीवर कामगार सभा, वनिता मंडळ अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

विमलताईंच्या आवाजात मार्दव होते, आपलेपणाची लय होती. शब्दोच्चार स्वच्छ आणि अस्सल मराठी वळणाचे होते. त्यांच्याकडे कणखर, मजबूत जीवननिष्ठा असल्याने आणि जगाकडे, परिस्थितीकडे तिरकसपणे पाहण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने, विमल जोशींची कार्यक्रमांचे सादरीकरण करतानाची एकूण निरीक्षणे मार्मिक आणि मजेशीर असत. हिंदीतील इप्टा थिएटरमधील काही नाटकांतूनही यांनी अभिनय केला होता. बलराज सहानी, संजीव कुमार अशा अनेक कलावंतांसोबत त्यांनी हिंदी नाटकांतून कामे केली होती. 

कस्तुरीमृग, जास्वंदी, नटसम्राट, चाकरमानी आदी नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. चाकरमानी या मराठी नाटकात त्यांनी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्या आईची भूमिका साकारली होती. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ आणि डॉ. मीनल परांजपे या त्यांच्या कन्या असून, अभिनेते अशोक सराफ आणि डॉ. सुनील परांजपे हे जावई होत. विमल जोशी यांचे निधन १८ मे २०१५ रोजी झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZRRCM
Similar Posts
कमलाबाई कामत-गोखले स्त्री भूमिका पुरुषांनीच करण्याच्या काळात अशा भूमिका करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री कमलाबाई कामत-गोखले यांचा सहा सप्टेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language